सांसद आदर्श ग्राम योजना आढावा बैठक…
August 5, 2016सांसद आदर्श ग्राम योजना आढावा बैठक…
सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत मतदारसंघातील समाविष्ट गावांचा विकास हा ठरवून दिलेल्या कार्यकाळात पूर्ण
होण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न सुरू असून त्यासाठी जिल्हा प्रशासन मार्फत राबविण्यात येणार्या कामांचा आढावा हयापुढील काळात देखील घेणार असल्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी नमूद केले आहे.
खासदार जनसंपर्क कार्यालयातून सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संबंधित सुरू झालेल्या व सुरू न झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी शिरोळे ह्यांच्या पुढाकारातून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ह्या बैठकीस जिल्हाधिकारी सौरभ राव, सर्व संबंधित खात्याचे अधिकारी . खासदार संपर्क कार्यालयाचे धनंजय देशमुख, सत्यजित थोरात आदि उपस्थित होते.
वडगाव शिंदे गावातील एकूण १० कोटी रुपयांच्या कामामधील मूलभूत नागरी सुविधांच्या निर्मितीसाठी वन हक्ककायद्यांतर्गत जमीन उपलब्ध करून देणे, गावातील शाळांची तातडीने दुरूस्ती करणे, गावात प्राथमिक आरोगी केंद्र वएटीएम केंद्राची उभारणी करणे, गावातील वीज वितरण केंद्र शहराच्या लाईनशी जोडणे व बचत गटासाठी शिंदे वस्ती येथे स्वस्त धान्य दुकान उपलब्ध करून देण्याबरोबरच तूर डाळ निर्मितीसाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणे आदि विविध विषयांवर ह्या बैठकीत चर्चा करून पुढील कार्यवाही निश्चित करण्यात आल्याचे शिरोळे म्हणाले.
सांसद आदर्श ग्राम योजनेतील दुसर्या आणि तिसर्या टप्प्यातील मुळशी तालुक्यातील कोळावडे व शिरूर तालुक्यातील कासारी ह्या गावांचा विकास आराखडा येत्या 15 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे सौरभ राव ह्यांनी बैठकीत नमूद केले. त्याचप्रमाणे गावकऱ्यांच्या विनंतीला अनुसरून शिरोळे ह्यांच्या सूचनेनुसार वडगाव शिंदे गावातील अनधिकृत हातभट्टी केंद्र आगामी तीन दिवसात नष्ट करण्याची ग्वाही जिल्हाधिकार्यांनी बैठकी दरम्यान दिली आहे.