एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे

November 10, 2021

एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे…!आज माझ्या मतदार संघातील शिवाजीनगर आगार येथे जाऊन एस टी कर्मचारी बांधवांच्या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला. त्यांच्या व्यथा व भावना येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य सरकारपुढे मांडणार असून जोपर्यंत एस टी महामंडळाचे राज्यशासनात विलीनीकरण होत नाही तोपर्यंत या महाविकास आघाडी सरकारसोबत संघर्ष चालूच ठेवणार आहे.जिच्या येण्याने गावोगावाचा विकास झाला, जिच्या येण्याने खेडी शहराशी जोडली गेली, जिच्या येण्याने महाराष्ट्राच्या घराघरामधील नाती अतूट राहिली, आज तिच्या चालकांची दयनीय अवस्था झाली आहे. सर्वांनी कधीना कधी लालपरी मधून प्रवास केलाच असेल, आज वेळ आली आहे, त्या सर्व बांधवांसाठी उभं राहायची ज्यांनी वेळी अवेळी रात्री अपरात्री अखंड महाराष्ट्रात सेवा पुरवली अशा लालपरीला वाचवण्याची वेळ आलेली आहे.एस टी म्हणजे सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे. सर्व सामान्य नागरिकांना प्रवासासाठी हक्काचे साधन म्हणजे एस टी होय, आणि ऐन दिवाळीच्या काळात राज्यसरकार च्या उदासीन धोरणामुळे आणि कर्मचाऱ्यांप्रति असंवेदनशील वर्तणुकीमुळे अहोरात्र राबणाऱ्या या एस टी कर्मचारी बंधू भगिनींची दिवाळी अंधारात गेली आणि प्रवासी जनतेचे सुद्धा खूप हाल होत आहेत. येत्या दोन-तीन दिवसांमध्ये शाळा सुरू होत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना देखील या आंदोलनाचा त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे..एस टी च्या जवळपास 35 कर्मचाऱ्यांनी नैराश्यातून आत्महत्या केलेल्या आहेत आणि बऱ्याच कर्मचाऱ्यांचे मनोबल खचले आहे. महाराष्ट्र राज्याचे निष्क्रिय व उदासीन मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांना या कर्मचाऱ्यांविषयी मुळीच आस्था नाही.परिवहन मंत्री श्री. अनिल परब यांचे हेकेखोरपणा मुळे आज अनेक कर्मचाऱ्यांनी आपले जीव गमावले आहेत. त्यामुळे या आत्महत्यांना परिवहन मंत्री अनिल परबच दोषी आहेत. त्यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. लवकरात लवकर जर सरकारने तोडगा काढून या कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही तर सरकारला सळो की पळो करून सोडू असा इशारा मी देत आहे. माझी एस टी कर्मचारी बंधू – भगिनींना नम्र व कळकळीची विनंती आहे कि त्यांनी आत्महत्येचा विचार मनामध्ये आणू नये. आपल्याला ही लढाई मोठ्या धैर्याने व ताकदीने एकत्रित लढायची आहे. आणि आपण ही लढाई नक्कीच यशस्वीपणे जिंकू असा मला विश्वास आहे. यावेळी भाजपा शिवाजीनगर अध्यक्ष मा. रवींद्र साळेगावकर, मा. सुनील पांडे, मा. प्रतुल जागडे, मा. गणेश बगाडे, मा. आनंद छाजेड तसेच शिवाजीनगर भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Add your gallery here